Sunday, 10 September 2023

वाफाळलेल्या पत्रातून...

प्रिय जन्म,
              प्रियच आहेस तू मला. कारण, सध्या तुझी किंमत करणारे कमीच उरले आहेत. असं म्हणतात की, "आयुष्यातील सगळ्यात सुंदर भेट कोणती तर ती जन्म." तुझ्याचमुळे तर अनेकांना हे जग बघण्याची संधी मिळते. दृष्टी मिळत नाही हा भाग वेगळा. आज तुलाच तुझ्याच विषयी कितीतरी प्रश्न पडले असतील. दररोज घडणाऱ्या अनेक घटनांनी तुझं हृदय अगदी पिळवटून टाकलं असेल. म्हणूनच आज तुला पडलेल्या सगळ्या प्रश्नांचं निरसन करण्यासाठी मी स्वतः स्वतःला बोलतं करण्याचा प्रयत्न करतो आहे. सध्या प्रत्येकाच्या ओठी अर्ध्यातून आपलं आयुष्य संपवणाऱ्या लोकांबद्दल फक्त का,का आणि का हा एकच सवाल असतो. जशी तू जन्म घेऊन तुझी जबाबदारी पार पाडतो त्याप्रमाणेच मी माझीही; जीवघेणी असली तरी त्यांना सोडवण्यासाठी मला ती पार पाडावीच लागते.
               तुला वाटत असेल, एखाद्याच्या आयुष्यात तू आलास म्हणजे तो नशीबवान ठरला. पण जसा जसा तो मनुष्य वाढत जाईल तस तशा त्याच्या आयुष्यात कितीतरी अडचणी येत जातात. त्यातून तो स्वतःला उभा करतो. परत पडतो. परत उभा राहतो. पण हे सगळं कितीकाळ? असं ओंडक्याप्रमाणे हेंदकळत राहणं सगळ्यांनाच जमेलच असं नाही. कुठेतरी या सगळ्यांची मर्यादा संपते आणि हेच लोक माझी कास धरू लागतात. माझी कास धरावी वाटणं हे तितकसं सोपही नाही. माझा रस्ता पकडणारे हे लोक कित्येक काळापासून अनेक लोकांमध्ये राहूनही एकलकोंडे आयुष्य जगत असतात. ते कोणत्या परिस्थितीतून जात आहेत याचीही आपल्याला जाणीव नसते. नैराश्य, हारण्याची भिती, एकांत, बोचरे बोल, सतत कोणाच्यातरी थट्टेचा विषय बनणं हे आणि अजून कितीतरी घाव सातत्याने झेलत असताना त्यांची सहनशीलता संपते आणि त्याला स्वतःस संपवण्याची इच्छा निर्माण होते. यावर समोरचा सोपा उपाय म्हणजे दुर्देवाने मी. हे लोक माझ्या गर्तेत खोलवर पहुडण्यासाठी आसुसलेली असतात. निंदतेचे निखारे अंगावर जाळून त्यांचं अंतर्मनही निपचित पडलेलं असतं. या सगळ्याची तुला जाणीव होणं अशक्यच. कारण, एखाद्याला समजून घेणं आणि त्याच्या कृतीमागील भूमिका ओळखणं याचा सगळीकडेच आभाव आहे. त्यामुळे त्याला तू तरी कसा अपवाद असशील? एखाद्याचं जन्म घेणं हे जेवढं सहज असतं, तेवढंच ते जगवणं आणि मुळात ते जगणं तितकंच कठीण. आकाशात उडणाऱ्या उंच पतंगाला काटण्यासाठी जसा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो तसचं काहीसं माझा विचार करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत घडत असावं. त्याचीही अवस्था ही कटी पतंग सारखी होते. स्वतःला गिळंकृत करण्याचा विचार करताना त्याला प्रचंड आनंद होतो अशातला भाग नाहीच. याउलट एखाद्या मधमाशीचं मोहोळ उठावं तसं विचारांचं मोहोळ त्याला पछाडत असतं. माझ्याकडे पाऊल टाकताना समोर त्याच्या कुटुंब येतं, मनापासून प्रेम करणारी माणसं त्याला दिसतात पण या सगळ्यांपेक्षा त्याला तेव्हा महत्वाचं वाटतं ते त्याचं स्वतःचं खालवलेलं मन. या सगळ्यातून जाताना त्याची स्वतःला संपवण्याची तयारी तर होते पण तेव्हाही त्याला दरदरून सुटणारा घाम, आतल्या आत होणाऱ्या घुसमटीमुळे अकांततांडव करणारे त्याचे डोळे, कोणीही किंमत न केल्यामुळे त्याचे कोरडे पडलेले अश्रू या सगळ्यांचा साक्षीदार आहे मी. आपलं दुःख आपण कोणालाही सांगू तर शकतो पण ते वाटून घेण्याचं धाडस कोणीही करू शकत नाही याचीच सल त्या व्यक्तीला लागलेली असते.
                    मूळात मी अशा व्यक्तीचं समर्थन करत नाहीच. मी फक्त त्या वेळी या लोकांच्या मनात उठणाऱ्या भावकल्लोळाचा आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा जन्मा, तुला एकच विनंती आहे, जेव्हाही कोणाच्या आयुष्यातली सुंदर भेट म्हणून येशील तेव्हा त्यांना कोणत्याही परिस्थितीत हिंमतीने लढण्याचे आणि स्वतःचे आयुष्य स्वतःच्या हाताने न संपवण्याचे बाळकडू पाजून पाठव. म्हणजे ते त्यांच्या भेटीची किंमत मृत्यूच्या पारड्यात तोलणार नाहीत. कधीच माझा विचार कोणीही करू नये. इथून पुढे मी कोणाच्याही उपयोगी पडू नये, हीच सदिच्छा. कळावे!
                                                          तुझाच हितचिंतक
                                                          आत्महत्या
                                                          

Friday, 31 December 2021

हा, मर्द को भी दर्द होता है!

कोवळ्या वयातील बहिणीचे लग्न लावून दिल्यावर त्याबद्दल हळहळ वाटून ढसाढसा रडणारा कुणी भाऊ मी तरी क्वचितच पहिला असेन. बायकोच्या डिलिव्हरी वेळी प्रचंड अस्वस्थ होऊन तिच्या वेदना वाटून घेता येत नाहीत म्हणून कासावीस झालेला कुणी नवरादेखील मला सहसा पाहायला मिळत नाही. मला त्रास होतो, वेदना होतात कुणी माझ्याशी वाईट वागल्यावर, असं ठणकावून सांगणाऱ्या आणि अश्रूंना कमजोरी न मानणारे असे मित्र सुद्धा मला कमीच पाहायला मिळाले आणि यामागचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे तो पुरुष जातीत जन्माला आला. 

लहानपणापासून आपण हेच ऐकत आलेलो आहोत की, 'मर्द को कभी दर्द नही होता!' का? तो माणूस नाही का? त्याला सुद्धा भावभावना, प्रेम हे सगळं वाटत असेलच की! मग का त्याने ते व्यक्त करण्यात कुचराई  करावी? अर्थात यालाही जबाबदार समाजाच आहे. कारण मुलगा म्हणून जन्म घेतला की त्याच्या मनावर हेच बिंबवलं जातं की तू मुलगा आहेस. मुलं रडत नाहीत. मुलं कणखर असतात. लेचपेचं राहणं मुलांच्या जातीला शोभत नाही, वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टींचा भडीमार हा त्याच्यावर अगदी लहानपणपासूनच होत असतो म्हणून पुरुष आपल्या भावना व्यक्त करायला धजावत नाही. 

सगळ्या घराला सांभाळणे हे केवळ पुरुषाच्याच हातात असते त्यामुळे ‘एक पुरुष म्हणून तू धीट आणि कणखरच राहायला हवं’ असं प्रत्येकवेळी त्याला सांगितलं जातं. त्यामुळे काही दुखत खुपत असताना किंवा मनात खूप काही साठलेलं असताना ते सांगण्याची चोरीच त्याला स्वतःच्या घरात झालेली असते. आपला बाबा रडतो आहे असं कधीतरीच एखाद्याने पाहिलेलं असावं कारण बाबा हा नेहमी तापट असतो मायाळू, प्रेमळ अशी बिरुदं त्याला लागू होतच नाहीत असा समज आपल्या समाजाने घालून दिलेला आहे. त्यामुळे समाजाच्या समजूतीपेक्षा काहीतरी वेगळं असं घडायला सुरूवात झाली की तिथेच पुरुष म्हणून त्याच्या स्वभावाची खिल्ली उडवायला सुरूवात होते. आपण रडलो तर लोक काय म्हणतील? याचाच विचार प्रत्येक वडील, भाऊ आणि एक पुरुष म्हणून त्याच्या मनात येतो आणि तिथेच तो त्याची भावना दाबून अगदी कुस्कुरून त्याचा चुराडा करून टाकतो.

घरात कोणती अडचण असली किंवा जावाजावात काही झालं की बायका इकडच्या गोष्टी तिकडे करण्यात एक सेकंद सुद्धा घालवत नाहीत. पण पुरुषांचे तसे नसते. त्याला असलेल्या अडचणी बोलून दाखवता येत नाहीत किंवा त्या समजून घ्यायला सुद्धा त्याच्याकडे कोणी नसतं, असं म्हटलं तरी ते वावगं ठरू नये. मूळात आपल्या समाजात रडणं हेच दुबळेपणाचं लक्षण मानलं जातं. त्यात पुरुष रडतोय हे म्हटल्यावर तर काय बाईसारखं रडतोयस हे न चुकता ऐकायला मिळतं. एवढंच काय पण जर त्याला एखाद्याचे वागणे पटले नसेल आणि त्याबद्दल तो बोलू लागला की लगेच काय चहाड्या करतोस बायकांसारख्या हे त्याला ऐकायला मिळते. एखाद्याला सतत आपल्या भावना बोलून दाखवता येत नाहीत म्हणून त्यासाठी कृतीचा आधार घेतला जातो. जेव्हा पुरुषाला व्यक्त होता येत नाही तेव्हा त्याच्या वागणुकीत फरक पडतो. हसून खेळून राहणारा कमालीचा शांत होतो. रागीट माणूस मवाळ होतो तेव्हा आपणच समजून घ्यायचे असते की मर्द अभी दर्द में है! व्यक्त होणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे मग ज्याला त्याला रडून, हसून, प्रेमाने, रागाने कसं का होईना व्यक्त व्हायचं असेल तर त्याला व्यक्त होऊ दिलं पाहिजे. त्याच्यावर समाजाच्या तकलादू प्रतिष्ठेची बंधनं लादता कामा नये. 

जाती आणि लिंगभेदाचा बाजार आपण सगळीकडे मांडतोय पण भावना व्यक्त करायच्या बाबतीत तरी तो पुरुष आणि ती स्त्री असा भेदभाव न केलेला बरा. जेव्हा समाजाच्या मानसिकतेत फरक पडेल तेव्हाच पुरुषांना सुद्धा रडताना कसलीच लाज वाटणार नाही. त्यालाही रडून मोकळं होणं कायं असतं याचा अनुभव खुलेपणाने घेता येईल. तेव्हा कुठे पुरुषांचा व्यक्त होण्यासाठीचा संघर्ष संपेल आणि 'मर्द को भी दर्द होता है' असं म्हणून आपण त्याच्या दु:खात सामील होऊन त्याला धीर देऊ शकू. 

-अदिती मळेकर

Saturday, 13 March 2021

अवनी...!

प्रिय अवनी,
                काल तुला गोळ्या घालून मारण्यात आल्याचं कळालं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं.किती निर्दयी लोकं असतील ती?तू त्यावेळेस किती विव्हळली असशील...तू माणसांना खातेस,१३लोकांना तू तुझं भक्ष्य बनवलस आणि २५ गावात तुझी दहशत होती,असे त्यांनी तुझ्यावर आरोप लावलेत. क्रूरतेच्या साऱ्या सीमा पार केलेल्या लोकांना तुझ्यावर गोळ्या झाडताना आणि रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या तुला कसं बघवल गेलं असेल?हा सगळा विचार करतानाच मला सुन्न व्हायला झालंय.
                 तू काल गेलीस म्हणून काही संवेदनशील व आस्था वाटणाऱ्या लोकांकडून तुझ्याविषयी सोशल मीडियावरून हळहळ व्यक्त केली जात आहे,पण तिथेच तुझ्या दहशतीच्या गर्तेत अडकलेल्या लोकांकडून फटाके उडवून त्यांनी सुटकेचा आनंद साजरा केला.तेव्हा कीव करावीशी वाटली मला त्या लोकांची आणि त्यांच्या गोठलेल्या भावनांची.तुला मारण्यासाठी कित्येक कर्मचारी,हत्ती,शार्पशूटर, पिंजऱ्याची जमवाजमव केली होती.full planned होतं ते सगळंच! तू 'वाघीण' होतीस म्हणून तुझी दहशत होती.तू बोकड असतीस तर तुझेच लचके याच लोकांनी तोडून,मसाला मारून पार मिटक्या मारत खाल्ले असते.
                एकीकडे हेच लोक वाघ वाचावे म्हणून मोहिम्या आखतात,वाघांची संख्या कमी झाली म्हणून चर्चा करतात आणि दुसरीकडे याच लोकांनी तुझी हत्या करताना मागे पुढे देखील पाहिले नाही.तू लोकांचे बळी घेतलेस याचे दुःख आहेच,पण दोष पूर्णपणे तुझाही नाही.तुझ्या निवासाचे ठिकाण असणाऱ्या जांगलावरही यांचा डोळा आहे म्हणल्यावर तू तरी काय करणार? अवनी,तुझे जरा चुकलेच पण तुझ्या चुकीसाठी आमच्या जगतात कुठलेही न्यायालय नाही की शिक्षेची तरतूद नाही;नाहीतर तूही जबाब देऊ शकली असतीस.तुला जन्मठेप झाली असती,मग कसेतरी तू तुझे दिवस रखडले असतेस.निदान आत्ता अचानक मायेचे छत्र हरवल्याप्रमाणे तुझे बछडे पोरके तरी झाले नसते.मग तू परत तुझ्या राज्यात परतली असतीस.पण ते राज्य तरी आत्ता कुठं नीट राहिलय,तीही मनुष्यवस्तीच बनत चालली आहे.या लोकांना कळत नाहीये हे त्यांच्या कृतीने तुमचा आणि पर्यायाने अापलासुद्धा आधीवास धोक्यात आणत आहेत.
              इकडचा न्याय आणि कायदा जरा वेगळा आहे.इथे हजारो लोकांचे प्राण घेणाऱ्याला फाशीची शिक्षा होऊनही ते वर्षानुवर्षे जगतात.काय करणार?कायदेच माणसांच्या सोयीने बनवले आहेत.जर यांनाही गोळ्या घालून असे संपवता आले असते तर दहशतीच्या मार्गावर चालणारे सुद्धा शांततेत जगले असते.असो,तू गेलीस पण मागे एक विचार करायला लावणारा प्रश्न देऊन गेलीस,जो प्रत्येकाच्या डोक्यात दहशत पसरवेल एखाद्या वाघिणीप्रमाणेच...!
                                                  तुझीच बछडी,
                                                  अदिती.

गोल्डन डेज...!

         प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असा एक तरी 'कट्टा' नक्कीच  असतो. जिथे तो आपले एक एक क्षण मनमुरादपणे जगत असतो. जिथं त्याने मजा- मस्ती, टिंगटवाळी, भांडा -भांडी, रुसवेफुगवे,यश -अपयश या सर्वांची भेळ मिसळ चाखलेली असते.असाच एक कट्टा माझ्याही आयुष्यात नकळत आला आणि कधी त्या कट्ट्याची एवढी सवय होऊन गेली हे माझे मला देखील कळले नाही.
           हो!असा 'कट्टा' माझ्या आयुष्यात आहे आणि मला तो कायम माझ्या आठवणीत राहील,तो म्हणाजे "NSS कट्टा"national service scheme असा त्याचा fullform. राष्ट्राची सेवा करण्या हेतूने आपल्या माणसांनी बांधलेला हा कट्टा.या कट्ट्यावर मला मित्र मैत्रिणी कमीच पण भवा बहिणीची नाती जोपासणारी माणसे भेटली. कॉलेजमध्ये पाऊल पडताच माझी पाऊले आपसूकच कत्त्याकडे वळतात.कट्टा तसा निर्जीव, सिमेंट विटांनी बांधलेला,पण आमच्यात नवतरुण्याचे चैतन्य निर्माण करण्याचं काम तो अगदीच चोख करतो.
           आज कोण जाणे त्या 'कट्ट्याची' खूप आठवण येत आहे.एनएसएस मध्ये प्रवेश घेतला तेव्हा इतर जण या कट्ट्यावर तासनतास गप्पा टाकताना दिसत.तेव्हा नकळत एक प्रश्न डोकावयचा,यांना काही कामे नाहीत का,किती वेळ इथे बसतात?पण आता मला कळून चुकले आहे की या कट्ट्यात नक्कीच एक मॅजिक आहे जे लोकांना एकमेकांशी कनेक्टेड ठेवते.एक 
माझ्या जीवनातील अविभाज्य भाग बनेल असा मी विचारही केला नव्हता.
              पिंपळाच्या छायेत उभा असणारा हा कट्टा प्रत्येक घटनेचा साक्षीदार आहे.एनएसएस मध्ये श्रमदानाचे काम झाल्यावर आम्हाला विसवण्यास जागा देणारा तूच.कारण आमच्या एनएसएस चे ब्रीदवाक्य आहे 'Not me but you'. या कट्ट्यावर आम्ही सर्वांनी राडा घातला.कारण तसा आमचा मोटो आहे,"No compromise only rada."त्यामुळे राडा घालणं हा आमचा स्थायीभाव बनला नसून ती आमची गरज बनली आहे.
            कट्ट्याचा संबंध तसा अनेकाशी म्हणजेच अनोळखी नात्यांशी जोडला गेला आहे.काही अनोळखी नाती ही रक्त्याच्या नात्यापेक्षा जवळची बनू शकतात याची जाणीव कट्ट्याने करून दिली.तो माझ्या आणि या नवीन बनलेल्या नात्यातील दुवा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.एक कट्टा आपल्याला इतक्या गोष्टींची जाणीव करून देऊ शकतो याची. मी कल्पना ही केली नव्हती.बोलताना किती क्षुल्लक वाटते कट्टा पण ज्याने या कट्ट्यावर दिवस घालवले त्यालाच त्याची किंमत कळेल.नात्यांचे घट्ट वीण बांधायला ज्याने शिकवले त्याची तुलना आणि किंमत करणे वेडेपणाचे ठरेल. कट्ट्याने मला काय काय दिले तर मला हसायला शिकवले,सतत आनंदी राहण्याचे बळ दिले, दुसऱ्याशी नाते जपायला, वेळप्रसंगी मदत करायला,किती धावायचे अन् कुठे थांबायचे या सगळ्यांचा गुरु हा एकच '"कट्टा".इतकं सार शिकवलं पण सार विनामोबदला, निःस्वार्थी भावनेने.
             आज हे सारे लिहिताना माझे मन भूतकाळात डोकावत आहे. कट्ट्यावर घालवलेल्या रम्य आठवणीत गिरक्या घालत आहे.खरे सांगायचे तर या कट्ट्यावर मी माझे मोजकेच पण आनंदी क्षण जगले.कट्ट्याची आणि माझी मैत्री तशी केवळ सात महिन्यांची पण सात जन्म लक्षात राहील एवढी ताजी.कधीही न कोमेजणारी.या कट्ट्यावर आम्ही एकमेकांचे बर्थ डे साजरे केले.मग त्यात एकमेकांना केक फासणे, भरवणे असो, सेल्फी मध्ये आपण स्वतः दिसण्यासाठी केली जाणारी धडपड असो, नाहीतर भेळ आणि समोश्याची केलेली पार्टी असो,या सगळ्याच गोष्टी आपल्या अदृश्य कॅमेऱ्याने हा कट्टा सगळे कॅप्चर करत असेल असे माझे मन मला सांगते. कट्ट्यावर कधी कोणाचे बिनसले तर कधी प्रेम फुलले.कधी कोणी इथे चहाडी केली तर कधी चेष्टा तर कधी अगदीच गंभीर गोष्टी बोलल्या गेल्या.पण त्या नेहमीच माझ्यासाठी secrets राहतील.कारण आमचा कट्टा फक्त ऐकतो बोलत मात्र काहीच नाही. लेक्चर्स बंक करून तासनतास खिळवून ठेवण्याची क्षमता या कट्ट्यात आहे. तिथेच आम्ही आमचे projects journals assignment पूर्ण केल्या. कट्ट्यावर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर कट्टा कधी हसला,रडला,तर कधी रागावला, चिडला आणि विचारातही पडला नसेल का?कट्ट्याने तर आमची पथनाट्यची प्रॅक्टीस ही बघितली  आणि तेथे घडणाऱ्या गमतीजमतीवर तो खळ खळून हसला देखील असेल.आमचे यशानंतरचे कट्ट्यावर उभे राहून केलेले सेलिब्रेशन आणि अपयशानंतर आमच्या हिरमुसलेल्या चेहऱ्याचे वजनही "तू" पेलवले.नवीन कल्पना, विचारसरणी, योजना या तुझ्याभोवती बसूनच तर आखल्या गेल्या.इतकचं काय पण पाणी टाकीजवळ केलेली पाणी उडवा उडवीची मौज तूही नाही विसरणार याची मला खात्री वाटते.कट्टा  हा मला नक्कीच निर्जीव वाटत नाही.कारण निर्जीव गोष्ट कशी काय मला नवऊर्जा,उत्साह,जगण्याचे बळ,इच्छा आकांक्षा,स्वप्ने पूर्ण करण्याची जिद्द,प्रेरणा,दिशा या सर्वाची शिदोरी देऊ शकते?
                न राहवून एक विचार सतत येतो कट्ट्याची आठवण आज जशी मला येत आहे तशीच त्या कट्ट्यास आमची आठवण येत नसेल का?"कट्टा" हा माझ्या आयुष्याच्या लघुपटाचा दिग्दर्शक आहे. त्याच्या दिग्दर्शन करण्याच्या पद्ध्द ती बदलतील पण तो कधीच बदलणार नाही. कट्याच मला नेहमीच अप्रूप वाटत,कारण तो कधी उपकाराची भाषा बोलत नाही.सुखदुःखाने विणलेले सुखद क्षण मला या कट्ट्याने दिले.परत परत आठवावे असे पण न विसरण्यासारखे असे कट्टयाने काही शिल्लकच ठेवले नाही.आज मला मनोमन पटले आहे,माझ्या आयुष्यात जेव्हाही माझ्या flashback मध्ये रमेन त्यातली अतिशय सुखावणारी आणि नेहमीच प्रेरणा देणारी गोष्ट ही कट्टाच असेल.थोड्या दिवसांत आपला परस्पर दर्शी असलेला संबंध संपुष्टात येईल पण आपले मनोमन जोडलेले नाते हे फुलपाखराप्रमाणे सतत माझ्या समोर उडताना मला दिसेल.अस म्हंटल जात की'हव्या असणाऱ्या सगळ्याच गोष्टीची साथ ही एका मर्यादेपर्यंत असते.आपलेही काहीसे तसेच आहे आपली भेटण्याची मर्यादा संपेल पण विचारांची,प्रेमाची नव्हे.तुझे माझ्यावर आणि माझे तुझ्यावर असणारे प्रेम हे नक्कीच चिरंतन स्मरणात राहिल आणि प्रत्येकवेळी माझ्या डोळ्यातून आलेल्या आनंदाश्रूचा "तू" साक्षी असशील.
                                                   -aditi malekar

Tuesday, 27 November 2018

राम मंदिर की रामराज्य?

              सर्वच राजकीय स्तरांतून आणि पर्यायाने संपूर्ण सामान्य जनमानसात गेल्या काही दिवसातच एका प्रश्नाने डोके वर काढले,तो म्हणजे राम मंदिर की रामराज्य? या प्रश्नांचे सुकाणू अधिक जलदगतीने पोहचवण्याचे काम खऱ्या अर्थाने सुरू झाले ते मनसेच्या व्यंगचित्रकारामुळे.कोणतेही संकट आले की आधी स्मरण होते ते रामाचे.संकटसमयी जर राम आठवला तर यात फारसे नवल नाहीच आणि आता तर ऐन निवडणुकांच्या तोंडावर राम हाच तारणहार असणारा हा एक 'राजकीय स्टंट' आहे यात मुळीच शंका नाही.म्हणून हा राम आणि रामरक्षा यांचा जप म्हणून राम आणि राममंदिर यांच्याभोवती सर्वच राजकीय पक्ष पिंगा घालताना दिसत आहेत.
                सेनेने थेट आयोध्या गाठून कमळाला अधिकच चिखलात रूतण्यास भाग पाडले.इकडे यांनी अयोध्या जवळ केली खरी पण हे वरवरचे आहे की खरेच श्रीरामभक्त आहेत हे लवकरच स्पष्ट होईल.मनसेच्या सर्वेसर्वानी काढलेल्या व्यंगचित्रातून रामराज्य हवे होते, राममंदिर नव्हे असा टोला लगावला गेला.रामराज्य म्हणजे रामाचे राज्य नव्हे तर रामाची मूल्ये घेऊन जगणारे रामराज्यातील सामान्यजन.जिथे राजा व प्रजा यांना समान पारड्यात तोलले जायचे.जिथे जातीय वर्चस्व,दहशतवाद ,खून,हाणामारी,बलात्कार यांना थारा नव्हता.आज आपण रामायणातील कथा सांगताना शबरीच्या उष्ट्या बोरांची कथा ऐकतो,जी की लोकांना राजाचे सामान्यपण आणि समानता यांचे सार्थ दर्शन देते.असे हेच दर्शन या राज्यात होणे या जन्मी तरी शक्य आहे काय?
                   ने म्हणजे नेक,ता म्हणजे तारणहार.असा खरं तर नेता या शब्दाचा अर्थ.पण येथे दिसणाऱ्या राज्यात जो लोकांचं नेतो तो नेता हा अर्थ रूढ होतोय.या राज्यातील नेता म्हणजेच राजा.असा राजा की ज्यात रामाचा लवलेशही नसावा.आज सरकारविरोधी बोलणाऱ्याचे काय होते हे न बोललेलेच बरे!कारण तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याचा आमच्या राज्यात प्रघातच आहे.राजाची मर्जी राखण्यासाठी म्हणून इतर मंत्रीसुद्धा मूग गिळून गप्प आहेत. होयबा संस्कृती राबवण्याचा यांचा कल प्रकर्षाने दिसून येतोय.याचीच साक्ष हा चव्हाट्यावर आलेला वाद दर्शवतो.
                     स्त्रीदाक्षिण्य हे रामराज्याचे वैशिष्ट्य. असहाय अहीलेल्या रामाने मदत केली,मर्यादा ओलांडणाऱ्या शूर्पणखेला शिक्षा दिली.असे वर्तमानकाळात आजच्या स्त्रियांचे आहे का?आजच्या वर्तमानकाळात सर्वच बाबतीत ठणठणीत दुष्काळाच दिसतो.ना त्या निर्भिडपणे व्यक्त होतात ना मते मांडतात.एवढेच काय पण या उतरत्या कळेस चारचांद लावण्याचे लावले ते #meetoo ने.अशी वेळ ही या राज्यात यावी हीच खरी शोकांतिका आहे.राजाचे मुख्य कार्य हे जनतेत शांतता राखण्याचे असते.युध्याच्या वेळी राजा जनतेत अराजकता माजू नये यासाठी कटिबद्ध असतो आणि सद्य स्थितीत निवडणुका म्हणजे एक युद्धच आहे.ऐन निवडणुका तोंडावर असताना याच लोकांना नामी शस्त्र मिळाले ते म्हणजे 'राम' .पाहायला गेले तर ना यांच्या मनात राम ना बोलचालीत.
                  'प्राण जाये पर वचन ना जाये' याचेच डंके वाजवणारे हे लोक आपली पोळी मात्र चांगलीच भाजून घेत आहेत.सद्य स्थिती रामराज्याचे कोणतेच अवलोकन करताना दिसत नसेल तर राममंदिराची नेभळट आशा तरी काय कामाची?जिथे स्त्रियांच्या कर्तृत्वाची,कार्याची दखल घेतली जात नाही.तिचे अस्तित्वच मुळात धोक्यात आहे अशा राज्यात राममंदिर तरी काय कामाचे?वनवासी जाण्याची आज्ञा झाल्यावर सीतेने राज्यकारभार चालवावा अशी रामाने इच्छा दर्शवली.यातून रामराज्यातील स्त्रियांचे स्थान स्पष्ट होते.सद्य परिस्थितीत मात्र स्त्रियांचे पाय खेचण्याचेच दृश्य पहावयास मिळते.हा अजून एक पुरुषप्रधान संस्कृतीचा उत्तम नमुना म्हणता येईल.
                  रामराज्याचे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षण,कला ,आरोग्य यांना प्राधान्य.मात्र आजचे चित्र काही विपरितच आहे.सामान्य जनांसाठी चालू केलेल्या योजना त्या गरजूपर्यंत पोहचतच नाहीत हीच खरी परिस्थिती आहे.
                    इथे सगळे फक्त सत्तेचे उपासक आहेत.रामराज्य मागणाऱ्यांनी तरी नशिकात कुठे रामराज्य प्रस्थापित केले?नुसतीच आश्वासनांची सखरपेरणी करून टाळूवरचे लोणी खाणारी यांची जातच इथे अधोरेखित होते.जनतेला गरज ही राममंदिराची नव्हे तर रामराज्याचीच आहे.परंतु सल्ले आणि राजकीय टीकाटिप्पणी यातून फुरसत मिळेल तर हे साकार होईल.इथे कमळाने तरी नवीन असे काय केले,तर जनतेसाठी झटणाऱ्या तुकाराम मुंढेना बदलीची शिक्षा दिली.हेच ते रामराज्य आणि हेच ते इथले कायदे सगळेच धाब्यावर बसवलेले!
                   आमच्यासारख्या सामान्य माणसांना केंद्रस्थानी ठेवून,गळचेपी करून राममंदिराचे स्वप्न कधीच साकार होणार नाही.जेव्हा मनातल्या. रामासाठी मंदिराचे दरवाजे खुले होतील तेव्हा कुठे रामराज्याचे आणि पर्यायाने राममंदिराचे स्वप्न सफल संपूर्ण होईल.
                                    ✍अदिती मळेकर.
                                      

Thursday, 1 November 2018

खिडकीतून खिडकीबाहेर

           जेव्हापासून खिडकीत बसायला झालंय तेव्हापासून मी वेगळ्याच विश्वात रममाण होत चालली आहे.जराशी उसंत मिळाली की खिडकीची दारे मला आपसुकच बोलवत असल्याचा क्षणभर भास होतो आणि मी नकळत तिथे ओढली जाते.आजही काहीसे तसेच झाले.खिडकीकडे एक कटाक्ष टाकला आणि ती काहीशी माझीच वाट पाहत होती असे वाटले.
             खिडकीजवळ गेले,तिथे बसले अन् चिमण्यांचा चिवचिवाट होऊ लागला आणि मला माझ्या अंतरंगात चालणाऱ्या चिवचिवाटांचा आवाज अधिकच स्पष्टपणे येऊ लागला.कित्येक उलाढाली चालल्या होत्या त्यावेळेस कोण जाणे...! खिडकीजवळ बसले तेव्हा दिसलेले बाहेरचे जग होते ते  झाकोळल्या गेलेल्या एका निस्तेज सांजेप्रमाणे!बहुदा मनात चालणाऱ्या अस्वस्थतेमुळे सारे जग तसे भासत होते पण तेव्हा खिडकीच्या त्या खरेपणाचे मला कौतुक वाटले,कारण तिने तीच्याप्रमाणेच स्वच्छ असणाऱ्या काचेतून माझ्या मन:पटलाचे नितळ पण तितकेच क्लेशकारक दृश्य समोर ठेवले.तेव्हा तिचे राहवून मला अप्रूप वाटले की, खिडकीसारखी एखादी क्षुल्लक गोष्ट सुद्धा मनातले भाव इतक्या खऱ्या अर्थाने दाखवू शकते तर माणसांचे असे का नाही?ती खिडकी तेव्हा माझ्या हिशेबी जरा भावच खाऊन गेली.जेव्हापासून खिडकीत वेळ घालवत आहे तशी ती मला माझ्यातल्या 'मी'ला ओळखण्याची मुभा देतीये आणि ती रोज काहीशी वेगळी मला कळत चाललीये.ती माझ्याशी हितगुज करते.तिच्या स्फटिकाप्रमाणे शुभ्र काचा हे जग शुभ्र आहे असं सांगण्याचा नाहक प्रयत्न करतात पण जेव्हा खिडकीतून खिडकीबाहेर डोकावते तेव्हा जग काहीसे वेगळे भासते,मनाला न पटण्याजोगे!
              थोडेसे निवांत क्षण आणि स्वतःच्या मन:पटलावर जमा झालेली धूळ बाजूला करण्यास मिळालेली ही नवी सोबती गरज लागेल तेव्हा माझी वाट पाहतच असेल याची खात्री आहे;कारण तिलाही मोकळे व्हायचे आहे कधीतरी खिडकीतून खिडकीबाहेर...!
                                                         ©अदिती मळेकर.

Wednesday, 21 March 2018

आजचा विद्यार्थी बेशिस्त आहे?

          आजकाल माझ्या मनात सतत घोंगावत राहणारा एकच प्रश्न आहे,खरंच आजचा विद्यार्थी बेशिस्त आहे? आजकाल आम्हा विद्यार्थ्यांवर टीकेचा चौफेर हल्ला होत आहे.कोणी म्हणतो,आजचे विद्यार्थी बेजाबदार आहेत,कोणी म्हणातो ध्येयशून्य आहेत.तर कोणी म्हणतो पथभ्रष्ट आहेत. विद्यार्थ्यांवर टीका कराव्या अशा काही घटना,त्याची दहावीस उदाहरणे घडली असतीलही.पण टीका करताना एकतर्फी विचार करणे आम्हा विद्यार्थ्यांवर अन्यायाचे आहे.यासंबंधात विद्यार्थ्यांची बाजूही लक्षात घ्यायला हवी.ती कोणीच लक्षात घेत नाहीत.
            प्रत्येक दिवसाचे न्यूजपेपर हे विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीचे एक ना एक उदाहरण हमखास देते.विद्यार्थी बेशिस्त झाले आहेत असे विद्यार्थ्याखेरीज प्रत्येक जण बोलतो.तसे बोलावे असे काही प्रकार घडलेही आहेत.परंतु माझ्या मते बेशिस्त विद्यार्थ्यांस बेशिस्त समाजच घडवीत असतो, हे अनेकजण विसरतात.विद्यार्थी बेशिस्त का वागतात,याचा विचार आणि त्या समस्येवर उपाय शोधणे यांचा आपल्याकडे अभावच आहे.
            आजचा विद्यार्थी बेशिस्त नाही,तर कर्तृत्ववान आहे,तो एक पुस्तकी किडा राहिलेला नाही,तर त्याला सभोवतालच्या अनेक गोष्टींची जाणीव आहे.कॉम्प्युटरचा योग्य वापर तो करतो आहे. कॉम्प्युटरच्या वापरावरून पण आजचा विद्यार्थी बेशिस्त या उपाधीेस पात्र ठरतो.जणू काही आजचे विद्यार्थी बेेशिस्तीचे टॅग घेऊनच फिरत आहेत.लोक म्हणतात,आजचे विद्यार्थी बिघडले आहेत.फेसबुक,व्हॉटसअप सारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर वर तशी उदाहरणे घडलेही आहेत.परंतु त्यास विद्यार्थ्यांना दोष देणे कितपत योग्य आहे?सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर हा विद्यार्थी चांगल्या कामांसाठी सुद्धा करतो.पण हा समाज प्रत्येकवेळी विद्यार्थ्यांस वाईट दृष्टीच्या काम करण्या हेतूने पाहतो. ज्याप्रमाणे नाण्यास दोन बाजू असतात,तशाच प्रत्येक गोष्टीला चांगली व वाईट या दोन्ही बाजू असणे स्वाभाविकच असते.तासनतास साईट्सवर वेळ वाया घालवणे,यात आम्ही विद्यार्थी चुकतो पण त्यामुळे आम्ही बेशिस्त किंवा बेजबाबदार ठरत नाही.आजचा विद्यार्थी हा मल्टीटॅलेन्टेड आहे.आज प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थी पुढे आहे.विचारशील आहे.सरकारच्या प्रत्येक निर्णयावर त्याचे ठाम मत आहे.तो ध्येयशून्य नाही तर ध्येयकेंद्रीत आहे.
               आज विद्यार्थी अनेक छंद जोपासतो.ट्रेकिंगला जाणे,समाजसेवा म्हणून आदिवासी भागात किंवा झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन शिकवणे,विविध उपक्रम राबवणे यांसारखी कामे करतो.तेव्हा टीका करणारे टिकाकार म्हणातात,'हल्ली कॉलेजमधून अभ्यासाऐवजी अशी ही नसती फॅडच जास्त असतात'. 'छडी लागे छमछम विद्या येई घमघम' ही म्हण आज अस्तितवात नाही.कारण लादलेल्या किंवा अधिकार गाजवून शिस्त लावणे हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय चुकीचे आणि कठीण आहे,असे मला वाटते.Discipline must be based on love,must be controlled by love. असे आम्ही विद्यार्थी मानतो.
               जोपर्यंत अनाचारी,भ्रष्टाचार,स्वार्थी अधार्मिकता आजूबाजूला आहे,तोपर्यंत समाजास विद्यार्थी हा बेशिस्तच वाटेल.शिस्तबद्ध विद्यार्थी हा चारित्र्यसंपन्न विद्यार्थी,चारित्र्यसंपन्न विद्यार्थी हा चारित्र्याभष्ट समाजापोटी नाही जन्माला येऊ शकत.टीकाकारांना आजचे विद्यार्थी उद्दाम,उद्धट वाटतात.कारण त्यांच्या मते,आम्ही विद्यार्थी शिक्षकांना द्यावा तितका मान देत नाहीत.पण ही माणसे विद्यार्थ्यांची मने समजून घेतात का? 'आदर दाखवा' म्हणून कोणालाही आदर दाखवता येत नाही. ज्या व्यक्तीची वागणूक आदरास्पद आहे किंवा असते,यांच्यापुढे आम्ही विद्यार्थी कोणीही न सांगता आदराने नतमस्तक होतो.
             आजच्या विद्यार्थ्यांस वेगवेगळ्या फॅशन करायला आवडते.हीरोहेरॉईनसना फॉलो करायला आवडते.तो पिक्चर मधील हेरोवर फिदा होतो,क्रिकेट स्टार वर फिदा होतो,यात विद्यार्थी बेशिस्त का ठरावेत? सर्व गोष्टी जरी विद्यार्थी करत असला तरी तो बेशिस्त नाही की अविवेकी नाही.आजचा विद्यार्थी अधिक प्रगल्भ,जबाबदार व विचारशील आहे.त्याला आपल्या हक्काची जाणीव आहे व त्याबद्दल आम्ही जागरूक आहोत.हक्क आणि कर्तव्ये यांची योग्य सांगड आम्ही घालतो.राष्ट्रावर येणाऱ्या,कोणत्याही आपत्तीच्या  वेळी धावून जाणारा,हंड्यासारख्या नरबळी,बालविवाह यांसारख्या अयोग्य रूढींविरुद्ध  लढणारा,बलात्कार, अॅसिड हल्ला यांसारख्या चीड आणणाऱ्या गोष्टींवर पेटून उठणारा ,वेळोवेळी रुग्णासाठी,जवानांसाठी रक्तदान करणारा आजचा विद्यार्थी बेशिस्त कसा?
                                                                                                                                           -Aditi Malekar.

Wednesday, 7 March 2018

डीपी,स्टेटस अन् भगवा....विचारांचं काय?

           "प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता‌‌|
          शाहसुनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते|"
              हे शब्द आहेत राजमुद्रेतले,जे शिवाजी महाराजांच्या सामर्थ्याचे प्रतीक आहेत.हे शब्द जेवढे स्फूर्तिदायी वाटतात तेवढाच विस्मयकारी अर्थ त्यात सामावला आहे,तो असा, 'प्रतिपदेचा चंद्र जसा वाढत जातो आणि सारे विश्व त्याला जसे वंदन करतो,तशीच ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल.'खरचं राजमुद्रा आणि तिचा लौकिक वाढतोय? प्रश्न तसा अनुत्तरीत,कारण आजवर घडणाऱ्या समाजातील घटना पाहता महाराजांच्या लौकिकास नक्कीच धक्का बसतो आहे,असे म्हणता येईल.
             आजच्या तरुणपिढीचा किंबहुना पूर्वापार चालत आलेल्या तडफदार तरुणाईचा 'आदर्श राजा' म्हणजे 'शिवाजी महाराज'.एक राजा जो जनतेसाठी जगला.एक राजा योद्धा जो अन्यायाविरुद्ध आणि लोकहितासाठी लढला.एक नेता ज्याने गुलामासारख जगणं नाकारलं आणि जन्म दिला प्रतिष्ठित अशा महाराष्ट्रातील तमाम जनतेला. असं म्हणतात की 'जन्मदात्याकडून उपजत काही गुण मुलामध्ये येतात.' परंतु सद्य परिस्थिती पाहता महाराजांनी घालून दिलेले आदर्श किंवा कोणताही विचार समजाच्या पथ्यी पडला नाही याचीच साक्ष देतो.
              शिवजयंती असो,शिवराज्याभिषेक असो नाहीतर शिवपुण्यातिथी असो,जागोजागी शिवाजी महाराजांचे भव्य पुतळे, महाराजांचे डीपी, स्टेटस व्हॉटसअप, फेसबुक वर अगदीच दिमाखात झळकतात.भगवा जागोजागी फडकतानाही दिसतो.या सर्व गोष्टीतून समाजमनाची महाराजांविषयीची असलेली आत्मियता,प्रेम,अभिमान याचे दर्शन देते. डीपी,स्टेटस वर झळकणारे महराजांचे विचार हे तेवढ्यापुरतेच मर्यादित असलेले दिसतात.कारण स्वतःला मर्द मराठा किंवा मर्द मावळा म्हणवणारा तरी महराजांचा कोणता आदर्श घेतो?
            स्वउद् घोषित महाराजांचे भक्त स्टेटस लिहितात,'एका गालावर मारल्यास दुसरा गाल पुढे करणारे आम्ही नाही,आम्ही तो हातच मुळासकट छाटून टाकतो.कारण आम्हा शिकवण महाराजांची अन्याय करायचा नाही अन् सहनही करायचा नाही'.अशाच बड्या बाता मारणारे भक्त एखाद्या स्त्रीवर अन्याय होतो तेव्हा बघ्याची भूमिका पार पाडण्यात आपली धन्यता मानतात.अरे, तुमच्या गालावर मारल्यास तुम्ही तो हात छाटून टाकता तर स्त्रिजातीवर हात टाकणाऱ्या नाराधमचे हात का मुळासकट छाटले जात नाहीत?मग येथे महाराजांनी घालून दिलेले नियम फोल ठरतात.कारण 'येथे अन्याय होतो आणि सहनही केला जातो'.आज बलात्काऱ्यास शिक्षा व्हावी यासाठी मूकमोर्चे काढले जावे,याहून दुसरे दुर्दैव कोणते?कित्येक समाजातील मुलींचे  हकनाक बळी घेतले जातात तेव्हा त्यांच्या न्यायासाठी फक्त त्याच समाजातील लोक पुढे येऊन निषेध नोंदवतातम? इतर समाज तेव्हा कुठे असतो? महाराजांनी ना तेव्हा जातीचे राजकारण केले होते ना त्यांची शिकवण तसे करण्यास सांगते. तर मग आपण का आपल्या जातीव्यवस्थेशी एवढे बांधील राहावे?गरज आहे ती सर्वांनी एकत्र येऊन स्त्रियात्याचार रोखण्याची आणि महाराजांचे विचार अंमलात आणण्याची.
                  'भगवा' म्हणजे त्याग,बलिदान,ज्ञान, शुद्धता,सेवा, शौर्याचे प्रतीक.परंतु याचासुद्धा शिवभक्तांनी जातीच्या नावाखाली बाजार मांडला. भगवा म्हणजे समस्त हिंदू धर्माची शान व हिंदू राष्ट्राचा अभिमान.भगव्याच्या पवित्र छायेखाली कित्येक शूर विरांनी देशाच्या संरक्षणासाठी आपले प्राण त्यागले आणि आज हाच भगवा देशातील काही मतीभ्रष्ट, माथेफिरू लोकांमुळे धर्माचे राजकारण करण्यासाठी वापरला जातो,यातच खरी शोकांतिका आहे.आज भारतीय दारिद्र्य, बेकारी,अनिष्ट रूढी,आरक्षण यांच्या दबावाखली भरडला जातोय,तरी आजचा तरुण हा फक्त डीपी,स्टेटस आणि भगवा यांच्यामार्फत आपण प्रसिद्ध कसे होऊ याचाच विचार करतोय.लोकशाहीची बीजे पेरून गेलेल्या प्रजाहितदक्ष राजाला हुकुमशाही आणि अन्यायाच्या डीपी, स्टेटस आणि भगव्याच्या बेड्या मध्ये अडकवले गेले तेव्हाच महाराजांच्या विचारपत्रांच्या पत्रावळी झाल्या.जेथे आपण भगव्यास शौर्याचे प्रतिक मानले तेथेच काही तर्कट लोकांनी भिमा-कोरेगाव प्रकरणावर निषेध,दंगली इ.इ.करण्यासाठी अमानुषपणे भगव्याचा वापर केला.
                  'दिधले असे हे जग तये आम्हासी खेळावया|'असे मानून उन्मत्तपणे अजूनही भगव्यास खेळविले जात आहे. तळपणाऱ्या सूर्याप्रमाणे,अग्नीच्या ज्वलंत ज्वाली प्रमाणे ज्याची कीर्ती आहे अशा या भगव्यास जातीच्या नावाचे लेबलींग देऊन जाळले तेव्हा फडफडणारा भगवा तप्त ज्वालांच्या आगीत सुद्धा शिथील झाल्यासारखा भासतो.
                    'झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
                    जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
            घडविले श्रींचे स्वराज्य तुम्ही...'असे स्टेटस टाकणाऱ्या मर्दानो एकदा स्वतःला विचारून पाहा,श्रींच्या स्वराज्यात जागलेले तुम्ही 'मर्द मावळे' आहात?नक्कीच नाही.कारण जागलेला मर्द मावळा अन्यायाचे अफाट स्तोम मानले असताना झोपेचे सोंग घेणे शक्य नाही.महाराजांचे विचार जसे आपण डीपी,स्टेटस यांच्यावर अगदी सहजपणे ठेवतो तेवढ्याच सहजतेने जर ते मनात कोरून त्याची अंमलबजावणी झाली तरच छत्रपतींच्या विचारांची सार्थकता होईल.
                आजची तरुणाई वासनेत,अंध अफवा यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुरफटत चालली आहे.अशाच माथेफिरूना व्हॉटसअॅप,फेसबुक यांसारखी सोशल नेटवर्किंग साईट्स म्हणजे आयते कुलितच हातात आले याची जाण देतात.मोठ्या प्रमाणावर चुकीच्या माहितीच्या प्रसाराने, महाराजांच्या नावाखाली सरकारच्या कित्येक योजनांवर टीका,निषेध यांचे लोळ उठवले जात आहेत.अनेक प्रकारे अनेक वर्षांपासून चालत आलेले प्रकरण संपून जावे यासाठी सुद्धा अनेक स्टेटस आणि डीपीच्या माध्यमातून जनतेमध्ये असंतोष पसरला आहे. जनप्रक्षोभ मोठ्या प्रमाणावर उसळला आणि जनतेस जातीय दंगलीचा सामना करावा लागला किंबहुना आजही करतोय. महाराजांनी धर्मनिरपेक्ष म्हणजेच समता,मानवतावाद या मूल्यांची बीजे रोवली असताना 'धर्मनिरपेक्ष राजाचे' स्मारक बांधण्यासाठी सुद्धा सोशल नेटवर्किंग साईट्स द्वारे असंतोषाचे उद्रेक उफाळून येतात.महाराजांचे विचार हे 'हिंदू- मुस्लीम समानता','सर्वधर्मसमभाव','स्त्रीपुरूष समानता'यांची शिकवण देतात तर आम्हा आजच्या मावळ्यांचे विचार हे अधोगती आणि दहशतीच्या गर्तेत खोलवर चाललेले दिसत आहेत.
        'चिंता ना भिती ज्याच्या मनामध्ये राजे शिवछत्रपती,
         भगव्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे 
         घाबरतोस कोणाला वेड्या तू तर शिवबाचा वाघ आहे
       ज्याचे नाव घेता सळसळते रक्त अशा शिवभाचे आम्ही भक्त...'स्वतःस "शिवबाचा वाघ" म्हणवून घेणारे अंगात शेळीचे बळ देखील सामावू शकत नाहीत.फक्त शिवबाचे नाव घेऊन अथवा त्यांच्या नावाचे जयघोष करून उपयोग नाही तर महाराजांच्या विचारांना आपल्या चालू आयुष्यात स्थान देणे गरजेचे आहे.जर सळसळणाऱ्या भगव्या रक्ताचा एखाद्या गरजवंतास,अन्याय रोखण्यासाठी उपयोग झाला नाही तर तुम्हा तरुणाईचे स्टेटस हे फक्त आणि फक्त निरुपयोगी शब्दच राहतील.स्फूर्तिदायी स्टेटस, डीपी जसे निवडून ठेवले जातात तसेच जर चांगले विचार तेवढे निवडून घेतले तर छत्रपतींच्या स्वराज्याला अर्थ उरेल.
               शिवरायांचे विचार हे प्रबळ अशा परसत्तेशी झुंज देण्याचे,अंत:करणात अतूट व आखुट असा ध्येयवाद,आशावाद निर्माण करणारे,भूतकाळात सुद्धा त्यागाचे,पराक्रमाचे, ध्येयोत्क्तटाचे प्रसंग यासर्वांची स्फूर्ती देतात.इतकेच नव्हे तर शिवरायांचे विचार माणसाला माणूस म्हणून जगू देणारे...हात देण्याची वृत्ती जोपासणारे...प्रत्येक श्वास मोकळेपणाने घेऊ देणारे...तरुणाईच्या ऊर्जेला अनुभवाचे बळ देणारे...हे विचार समस्तांच्या 'दैवताचे'.
                  अशा जाज्वल्यमयी,स्फूर्तिदायी विचारांचे स्थान फक्त डीपी,स्टेटस आणि भगव्यापुरते संकुचित न ठेवता त्यांचा स्वतः च्या आयुष्यात उपयोग करावा.फक्त डीपी,स्टेटस ठेवून तुमच्या किंवा आमच्या विचारात फरक पडणार नाही.समाजातील चालू असणारी अंधाधुंदी जर अशीच चालू राहिली तर खरेच डीपी,स्टेटस अन् भगवा...विचारांचं काय? असंच म्हणावं लागेल.तेव्हा वेळ आली आहे विचार बदलण्याची. स्वत:ला जागे करण्याची...!!!
                                                               ©अदिती मळेकर

              
                  

वाफाळलेल्या पत्रातून...

प्रिय जन्म,               प्रियच आहेस तू मला. कारण, सध्या तुझी किंमत करणारे कमीच उरले आहेत. असं म्हणतात की, "आयुष्यातील सगळ्यात सुंदर भ...