प्रियच आहेस तू मला. कारण, सध्या तुझी किंमत करणारे कमीच उरले आहेत. असं म्हणतात की, "आयुष्यातील सगळ्यात सुंदर भेट कोणती तर ती जन्म." तुझ्याचमुळे तर अनेकांना हे जग बघण्याची संधी मिळते. दृष्टी मिळत नाही हा भाग वेगळा. आज तुलाच तुझ्याच विषयी कितीतरी प्रश्न पडले असतील. दररोज घडणाऱ्या अनेक घटनांनी तुझं हृदय अगदी पिळवटून टाकलं असेल. म्हणूनच आज तुला पडलेल्या सगळ्या प्रश्नांचं निरसन करण्यासाठी मी स्वतः स्वतःला बोलतं करण्याचा प्रयत्न करतो आहे. सध्या प्रत्येकाच्या ओठी अर्ध्यातून आपलं आयुष्य संपवणाऱ्या लोकांबद्दल फक्त का,का आणि का हा एकच सवाल असतो. जशी तू जन्म घेऊन तुझी जबाबदारी पार पाडतो त्याप्रमाणेच मी माझीही; जीवघेणी असली तरी त्यांना सोडवण्यासाठी मला ती पार पाडावीच लागते.
तुला वाटत असेल, एखाद्याच्या आयुष्यात तू आलास म्हणजे तो नशीबवान ठरला. पण जसा जसा तो मनुष्य वाढत जाईल तस तशा त्याच्या आयुष्यात कितीतरी अडचणी येत जातात. त्यातून तो स्वतःला उभा करतो. परत पडतो. परत उभा राहतो. पण हे सगळं कितीकाळ? असं ओंडक्याप्रमाणे हेंदकळत राहणं सगळ्यांनाच जमेलच असं नाही. कुठेतरी या सगळ्यांची मर्यादा संपते आणि हेच लोक माझी कास धरू लागतात. माझी कास धरावी वाटणं हे तितकसं सोपही नाही. माझा रस्ता पकडणारे हे लोक कित्येक काळापासून अनेक लोकांमध्ये राहूनही एकलकोंडे आयुष्य जगत असतात. ते कोणत्या परिस्थितीतून जात आहेत याचीही आपल्याला जाणीव नसते. नैराश्य, हारण्याची भिती, एकांत, बोचरे बोल, सतत कोणाच्यातरी थट्टेचा विषय बनणं हे आणि अजून कितीतरी घाव सातत्याने झेलत असताना त्यांची सहनशीलता संपते आणि त्याला स्वतःस संपवण्याची इच्छा निर्माण होते. यावर समोरचा सोपा उपाय म्हणजे दुर्देवाने मी. हे लोक माझ्या गर्तेत खोलवर पहुडण्यासाठी आसुसलेली असतात. निंदतेचे निखारे अंगावर जाळून त्यांचं अंतर्मनही निपचित पडलेलं असतं. या सगळ्याची तुला जाणीव होणं अशक्यच. कारण, एखाद्याला समजून घेणं आणि त्याच्या कृतीमागील भूमिका ओळखणं याचा सगळीकडेच आभाव आहे. त्यामुळे त्याला तू तरी कसा अपवाद असशील? एखाद्याचं जन्म घेणं हे जेवढं सहज असतं, तेवढंच ते जगवणं आणि मुळात ते जगणं तितकंच कठीण. आकाशात उडणाऱ्या उंच पतंगाला काटण्यासाठी जसा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो तसचं काहीसं माझा विचार करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत घडत असावं. त्याचीही अवस्था ही कटी पतंग सारखी होते. स्वतःला गिळंकृत करण्याचा विचार करताना त्याला प्रचंड आनंद होतो अशातला भाग नाहीच. याउलट एखाद्या मधमाशीचं मोहोळ उठावं तसं विचारांचं मोहोळ त्याला पछाडत असतं. माझ्याकडे पाऊल टाकताना समोर त्याच्या कुटुंब येतं, मनापासून प्रेम करणारी माणसं त्याला दिसतात पण या सगळ्यांपेक्षा त्याला तेव्हा महत्वाचं वाटतं ते त्याचं स्वतःचं खालवलेलं मन. या सगळ्यातून जाताना त्याची स्वतःला संपवण्याची तयारी तर होते पण तेव्हाही त्याला दरदरून सुटणारा घाम, आतल्या आत होणाऱ्या घुसमटीमुळे अकांततांडव करणारे त्याचे डोळे, कोणीही किंमत न केल्यामुळे त्याचे कोरडे पडलेले अश्रू या सगळ्यांचा साक्षीदार आहे मी. आपलं दुःख आपण कोणालाही सांगू तर शकतो पण ते वाटून घेण्याचं धाडस कोणीही करू शकत नाही याचीच सल त्या व्यक्तीला लागलेली असते.
मूळात मी अशा व्यक्तीचं समर्थन करत नाहीच. मी फक्त त्या वेळी या लोकांच्या मनात उठणाऱ्या भावकल्लोळाचा आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा जन्मा, तुला एकच विनंती आहे, जेव्हाही कोणाच्या आयुष्यातली सुंदर भेट म्हणून येशील तेव्हा त्यांना कोणत्याही परिस्थितीत हिंमतीने लढण्याचे आणि स्वतःचे आयुष्य स्वतःच्या हाताने न संपवण्याचे बाळकडू पाजून पाठव. म्हणजे ते त्यांच्या भेटीची किंमत मृत्यूच्या पारड्यात तोलणार नाहीत. कधीच माझा विचार कोणीही करू नये. इथून पुढे मी कोणाच्याही उपयोगी पडू नये, हीच सदिच्छा. कळावे!
तुझाच हितचिंतक
आत्महत्या