कोवळ्या वयातील बहिणीचे लग्न लावून दिल्यावर त्याबद्दल हळहळ वाटून ढसाढसा रडणारा कुणी भाऊ मी तरी क्वचितच पहिला असेन. बायकोच्या डिलिव्हरी वेळी प्रचंड अस्वस्थ होऊन तिच्या वेदना वाटून घेता येत नाहीत म्हणून कासावीस झालेला कुणी नवरादेखील मला सहसा पाहायला मिळत नाही. मला त्रास होतो, वेदना होतात कुणी माझ्याशी वाईट वागल्यावर, असं ठणकावून सांगणाऱ्या आणि अश्रूंना कमजोरी न मानणारे असे मित्र सुद्धा मला कमीच पाहायला मिळाले आणि यामागचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे तो पुरुष जातीत जन्माला आला.
लहानपणापासून आपण हेच ऐकत आलेलो आहोत की, 'मर्द को कभी दर्द नही होता!' का? तो माणूस नाही का? त्याला सुद्धा भावभावना, प्रेम हे सगळं वाटत असेलच की! मग का त्याने ते व्यक्त करण्यात कुचराई करावी? अर्थात यालाही जबाबदार समाजाच आहे. कारण मुलगा म्हणून जन्म घेतला की त्याच्या मनावर हेच बिंबवलं जातं की तू मुलगा आहेस. मुलं रडत नाहीत. मुलं कणखर असतात. लेचपेचं राहणं मुलांच्या जातीला शोभत नाही, वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टींचा भडीमार हा त्याच्यावर अगदी लहानपणपासूनच होत असतो म्हणून पुरुष आपल्या भावना व्यक्त करायला धजावत नाही.
सगळ्या घराला सांभाळणे हे केवळ पुरुषाच्याच हातात असते त्यामुळे ‘एक पुरुष म्हणून तू धीट आणि कणखरच राहायला हवं’ असं प्रत्येकवेळी त्याला सांगितलं जातं. त्यामुळे काही दुखत खुपत असताना किंवा मनात खूप काही साठलेलं असताना ते सांगण्याची चोरीच त्याला स्वतःच्या घरात झालेली असते. आपला बाबा रडतो आहे असं कधीतरीच एखाद्याने पाहिलेलं असावं कारण बाबा हा नेहमी तापट असतो मायाळू, प्रेमळ अशी बिरुदं त्याला लागू होतच नाहीत असा समज आपल्या समाजाने घालून दिलेला आहे. त्यामुळे समाजाच्या समजूतीपेक्षा काहीतरी वेगळं असं घडायला सुरूवात झाली की तिथेच पुरुष म्हणून त्याच्या स्वभावाची खिल्ली उडवायला सुरूवात होते. आपण रडलो तर लोक काय म्हणतील? याचाच विचार प्रत्येक वडील, भाऊ आणि एक पुरुष म्हणून त्याच्या मनात येतो आणि तिथेच तो त्याची भावना दाबून अगदी कुस्कुरून त्याचा चुराडा करून टाकतो.
घरात कोणती अडचण असली किंवा जावाजावात काही झालं की बायका इकडच्या गोष्टी तिकडे करण्यात एक सेकंद सुद्धा घालवत नाहीत. पण पुरुषांचे तसे नसते. त्याला असलेल्या अडचणी बोलून दाखवता येत नाहीत किंवा त्या समजून घ्यायला सुद्धा त्याच्याकडे कोणी नसतं, असं म्हटलं तरी ते वावगं ठरू नये. मूळात आपल्या समाजात रडणं हेच दुबळेपणाचं लक्षण मानलं जातं. त्यात पुरुष रडतोय हे म्हटल्यावर तर काय बाईसारखं रडतोयस हे न चुकता ऐकायला मिळतं. एवढंच काय पण जर त्याला एखाद्याचे वागणे पटले नसेल आणि त्याबद्दल तो बोलू लागला की लगेच काय चहाड्या करतोस बायकांसारख्या हे त्याला ऐकायला मिळते. एखाद्याला सतत आपल्या भावना बोलून दाखवता येत नाहीत म्हणून त्यासाठी कृतीचा आधार घेतला जातो. जेव्हा पुरुषाला व्यक्त होता येत नाही तेव्हा त्याच्या वागणुकीत फरक पडतो. हसून खेळून राहणारा कमालीचा शांत होतो. रागीट माणूस मवाळ होतो तेव्हा आपणच समजून घ्यायचे असते की मर्द अभी दर्द में है! व्यक्त होणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे मग ज्याला त्याला रडून, हसून, प्रेमाने, रागाने कसं का होईना व्यक्त व्हायचं असेल तर त्याला व्यक्त होऊ दिलं पाहिजे. त्याच्यावर समाजाच्या तकलादू प्रतिष्ठेची बंधनं लादता कामा नये.
जाती आणि लिंगभेदाचा बाजार आपण सगळीकडे मांडतोय पण भावना व्यक्त करायच्या बाबतीत तरी तो पुरुष आणि ती स्त्री असा भेदभाव न केलेला बरा. जेव्हा समाजाच्या मानसिकतेत फरक पडेल तेव्हाच पुरुषांना सुद्धा रडताना कसलीच लाज वाटणार नाही. त्यालाही रडून मोकळं होणं कायं असतं याचा अनुभव खुलेपणाने घेता येईल. तेव्हा कुठे पुरुषांचा व्यक्त होण्यासाठीचा संघर्ष संपेल आणि 'मर्द को भी दर्द होता है' असं म्हणून आपण त्याच्या दु:खात सामील होऊन त्याला धीर देऊ शकू.